कडक उन्हाळ्यामुळे त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याची भीती

कडक उन्हाळ्यामुळे त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याची भीती

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची?
डॉ श्रद्धा देशपांडे, प्लास्टीक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जरी आणि अस्थेटीक सर्जरीच्या सल्लागार शल्यविशारद, वोक्हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल-
उन्हाळा म्हटल्या की परीक्षा, सुट्टाय निवांत दुपारच्या गप्पा, आणि भरपूर सुर्यप्रकाश असं समीकरण आपल्या मनात घट्ट बसलेलं आहे, मात्र गेल्या काही वर्षात सुर्यप्रकाशाचा दाह वाढायला लागला असून उन्हाळ्यात आग ओकणाऱ्या सुर्यामुळे आपल्या त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याची भीती असते. याला फोटो एजिंग असंही म्हणतात
तरुण दिसण्यासाठीचे उपाय करून घेण्यासाठी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची त्वचा रापलेली असते किंवा त्यावर डाग दिसत असतात. डाग किंवा त्वचेचे रापलेपण हे प्रखर सुर्यप्रकाशामुळे होत असते. यामुळे दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठीच्या उपायांमध्ये प्रखर सुर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेची काळजी घेणे हे नितांत गरजेचे आहे. यामुळे त्वचेचा रापलेपणा किंवा त्यावर उठणारे डाग थांबवणं शक्य होतं. यासाठी फार पैसा खर्च करावा न लागता केले जाणारे काही सोपे उपाय खालील प्रमाणे आहेत.
1.शरीरातील पाण्याची पातळी
त्वचा तजेलदार दिसण्यासाठी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी. उन्हाळ्यामध्ये शरीराला असलेली पाण्याची गरज ही दीडपटीने वाढते. त्यामुळे आपण ऐरवी 2 लिटर पाणी पीत असू तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची गरज ही 3 ते 4 लिटर इतकी असते. शरीराला असलेली पाण्याची ही गरज फळांच्या रसाने किंवा शीतपेयांनी भागवली जाऊ शकत नाही.

  1. उन्हापासून बचाव करणे
    टळटळीत उन्हात घराबाहेर पडताना आपली आई आपल्याला नेहमी सांगायची की टोपी घालून जा किंवा छत्री घेऊन जा. असं म्हणतात की आईपेक्षा मोठा तज्ज्ञ या जगात कोणताही नाही. आई म्हणायची ते बरोबरच आहे. कडक ऊन असताना बाहेर पडण्यापूर्वी मोठी टोपी, छत्री किंवा गॉगल घालणं अत्यावश्यक आहे. खासकरून सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडणार असाल तर ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी. घराबाहेर पडल्यानंतर 30 पेक्षा अधिक एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन दर दोन तासांनी लावणे गरजेचे आहे. घरात असतानाही हा मार्ग अवलंबला तर उत्तम आहे. सनस्क्रीनचा वापर 2 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्ती करू शकतात.
  2. त्वचेचा पोत ओळखून त्वचेची काळजी घेणे
    एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की 88 टक्के लोकं ही त्यांच्या त्वचेसाठी उचित नसली तरी उत्पादने वापरत असतात. सगळ्यांच्या वापरासाठी योग्य असतील अशी उत्पादने फार कमी असतात. त्यामुळे आपली त्वचा कशी आहे हे ओळखून तशी उत्पादने वापरणे गरजेचे असते.
  3. त्वचेची स्वच्छता आणि पोषण
    डॉ श्रद्धा देशपांडे, प्लास्टीक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जरी आणि अस्थेटीक सर्जरीच्या सल्लागार शल्यविशारद, वोक्हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल हयांच्या मते उन्हाळ्यामध्ये चेहरा सॅलिसिलीक अ‍ॅसिडच्या मदतीने दिवसातून दोनवेळा चेहरा धुवावा. चेहरा, मान आणि छातीजवळची त्वचा ही नाजूक असते. अल्कलाईनचे प्रमाण जास्त असलेल्या साबणाने या भागाची त्वचा धुणे टाळावे. उन्हाळ्यामध्ये अनेकजण आणखी एक चूक अनेकजण करतात, ती म्हणजे मॉईश्चरायझरचा वापर टाळतात. थंडीप्रमाणेच उन्हाळ्यामध्येही त्वचेतील आर्द्रता राखणे गरजेचे असते. मॉईश्चरायझर किंवा स्निग्धता असलेली क्रीम वापरल्याने त्वचेची छद्र काही काळ बुजतात ज्यामुळे त्वचा काळवंडण्याची समस्या रोखता येते. हायलुरोनिक अ‍ॅसिड असलेली जेलबेस्ड मॉईश्चरायझर किंवा कोरफडीचा वापर करून तयार केलेली मॉईश्चरायझर वापरणे उन्हाळ्यात फायदेशीर ठरते. स्क्रबचा वापर करून आठवड्यातून दोनवेळा त्वचा स्वच्छ केल्यास त्वचा पुन्हा तजेलदार होते.
  4. मेकअप करताना आणि उतरवताना घेतानाची काळजी
    मेकअप करण्याच्या आधी एसपीएफ (Sun Protection Factor) लावणे गरजेचे असते. उन्हाळ्यात भरपूर किंवा गडद मेकअप करणे टाळावे. मिनरल बेस्ड मेकअप करावा. झोपण्यापूर्वी मेकअप उतरवणे, चेहरा स्वच्छ आणि मॉईश्चराईझ करणे हे गरजेचे असते. उन्हाळ्यात दिवसातून दोनवेळा आंघोळ करावी आणि शक्यतो कोमट पाण्याने करावी. चेहरा धुतल्यानंतर तो टीपून कोरडा करा, याने संसर्गामुळे होणारी बाधा टाळता येते.
  5. केस आणि नखांची निगा राखणे विसरू नका
    त्वचेची काळजी घेत असताना आपण केस आणि नखांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतो. कडक उन्हामुळे केस निर्जिव होतात, गुंततात आणि केसाखालील त्वचेवर फोड येण्याचीही भीती असते. यामुळे उन्हात जाताना डोकं झाकलं जाईल याची काळजी घ्या, ज्यासाठी तुम्ही छानशी हॅट वापरू शकता किंवा छत्रीने डोकं झाकू शकता. उन्हाळ्यामध्ये केसाखालील त्वचा स्वच्छ राखा आणि आणि त्यातील आर्द्रता योग्य राहील याची काळजी घ्या. यासाठी आठवड्यातून एकदा आंघोळीपूर्वी केसाला आणि केसाखालील त्वचेला खोबरेल तेलाने मसाज करा. केस धुतल्यानंतर चांगल्या प्रतीचा कंडीशनर वापरणे हे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात नखांचे झालेले नुकसान कमी करण्यासाठी सलूनमध्ये किंवा घरच्याघरी मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घ्या.
  6. ओठ आणि डोळे
    वय वाढू लागल्याची सगळ्यात पहिली लक्षणे ही डोळे आणि आसपासच्या भागात दिसून येतात. डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा ही नाजूक असल्याने सुरकुत्या पडणे, डोळ्याभोवती काळी वर्तुळे येणे, डोळ्याखालचा भाग सुजमट दिसणे अशा बाबी दिसू शकतात. डोळ्यांची निगा राखण्यासाठी उन्हात बाहेर पडताना गॉगल घालणे, डोळे स्वच्छ करण्यासाठीचे क्लिनर्स, डोळ्यांना थंडावा देणारे मास्क यांचा वापर केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ओठांची आर्द्रता राखणेही गरजेचे असते, यासाठी व्हिटामिन-ई आणि हायलुरोनिक अ‍ॅसिडच्या सहाय्याने कयार केलेले लिप कंडिश्नर आणि लिप बामचा वापर केला पाहीजे. तूप किंवा साय लावली तरी ओठांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
  7. उन्हाळातील सकस आहार
    उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो याकडेही लक्ष दिले पाहिजे. रंगीबेरंगी फळे ही डोळ्यांना सुखावणारी असतात तशीच ती पोटासाठीही चांगली असते. आंबा, पपई, अननस, खरबूज आणि लिंबूवर्गीय फळे खाल्ली पाहिजेत. भोपळा, लाल गाजरे, टरबूज, बीटाचे सेवनही उन्हाळ्यात शरीरासाठी चांगले असते. भाज्यांबाबत बोलायचे झाल्यास सगळ्या पालेभाज्या उन्हाळ्यात खाल्ल्या पाहिजेत. लाल मांस, झणझणीत रस्से आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. कमी तेलात तयार केलेले किंवा कच्च्या भाजांची सॅलेड खाल्ली पाहिजेत. घट्ट गोड दही, ताजी फळे यामुळे पोटही भरते आणि शरीरलाही आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात. आहारमध्ये बदल केल्याचे सकारात्मक परीणाम तुमच्या त्वचेवर दिसतात.

तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि उन्हाळ्यातही फिरायला जाऊ शकता, सेल्फी काढू शकता आणि हवी ती धम्माल करू शकता.